सोलापूर – “पद्मावती ताईंच्या कविता म्हणजे साधेपणाच्या पलीकडचा अनुभव आहे. त्यांच्या ओळींमध्ये आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आणि तत्त्वचिंतनाचा संगम आहे. ‘आत्मरंग’ वाचताना प्रत्येकाला आपापला रंग सापडेल, काहींना आशेचा, काहींना संघर्षाचा, तर काहींना प्रेमाचा. हीच या काव्यसंग्रहाची खरी ताकद आहे,” असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पद्मावती कुलकर्णी यांच्या ‘आत्मरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच सोलापुरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात संग्रहाचे सखोल विश्लेषण केले. “प्रत्येक विभागात मांडलेले भावविश्व, प्रतीकांची निवड आणि छंदरचना या सर्व गोष्टींतून कवयित्रींची समृद्ध काव्यदृष्टी जाणवते,” असे ते म्हणाले.
या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ कवयित्री वंदना कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून संग्रहाचे रसग्रहण केले. “‘आत्मरंग’मधील कविता एका नाजूक जाणिवेचा आणि प्रगल्भतेचा संगम दर्शवतात. पद्मावती ताईंची भाषा साधी असूनही अर्थगर्भ आहे. स्त्रीमन, काळाचे भान आणि आत्मशोधाच्या प्रक्रियेचा सुंदर परिपाक त्यांच्या लेखनातून जाणवतो,” असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी प्रकाशक राजेंद्र भोसले, सौ. राजश्री भोसले, श्रीकांत कुलकर्णी आणि कवयित्री पद्मावती ताई कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमात मैथिली राळे आणि अनघा हरिदास यांनी पुस्तकाविषयी आपली मनोगते मांडली, तर स्वतः कवयित्री पद्माताई कुलकर्णी यांनी आपल्या सृजन प्रक्रियेविषयी उलगडा केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कुलकर्णी यांनी केले तर श्रेयस जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. वरदा राळे आणि अनन्य हरिदास यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या समारंभाला भाग्यश्री अभ्यंकर, डॉ. उमा वळसंगकर, नारायणराव दुमालदार, कवी गोविंद काळे, श्रद्धा जोशी यांच्यासह सोलापूरातील अनेक साहित्यप्रेमी, कवी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.