सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मतदारांनी जागरूक राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केले
प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवार माजी महापौर मनोहर सपाटे, कीर्ती सचिन शिंदे, अंकुश राठोड व रेखा लहू गायकवाड यांच्या प्रचारार्थ थोबडे वस्ती, देगाव, पावन गणपती, देशमुख पाटील वस्ती आदी ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
माजी महापौर सपाटे यांनी मतदारांना संबोधित करत आपल्या पॅनलला भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले. “मी यापूर्वी 56 लोकांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. माझ्यासोबत उभे असलेले सर्व उमेदवारांना देखील ती संधी उपलब्ध करून देऊ. कारण ते आपापल्या पक्षांशी एकनिष्ठ होते; मात्र त्यांच्यावर अन्याय झाल्याने ते आज अपक्ष म्हणून आपल्यासोबत आले आहेत,” असेही सपाटे म्हणाले.
शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षाकडून आपल्याला सहकार्य मिळत असून, शिवसैनिक व कार्यकर्ते सक्रियपणे प्रचारात सहभागी होत असल्याचे सपाटे यांनी सांगितले. “या परिसरात बदल घडवून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सभेस लहू गायकवाड, बॉबी शिंदे, अतिश म्हेत्रे, दत्ता भोसले, सोनल भोसले, दत्ता खलाटी, नागेश रुपनर, नागनाथ पवार, श्याम गांगर्डे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















