सांगोला – डाळिंबातील क्रॅकिंग व पाकळी कुजवा थांबवण्यासाठी सदाशिव चौगुले यांनी शेतीमध्ये केलेले प्रयोग व वापरलेले तंत्रज्ञान परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणे यश व प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन डाळिंबरत्न भागवत पवार यांनी केले. जुजारपूर ता.सांगोला येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव चौगुले यांनी माळरानावरती फुलवलेल्या डाळिंब बागेची पाहणी करताना ते बोलत होते.
यावेळी कृषी अधिकारी दिपाली जाधव, सहा.कृषी अधिकारी बी.डी.जाधव, प्रा.घाडगे, केशरमाती कृषी उद्योगाचे सतीश पाटील, नेटाफिम इरिगेशन ठिबक कंपनीचे संकेत पाटील, पत्रकार दशरथ बाबर तसेच कोळा, जुनोनी, जुजारपूर, चोपडी, करांडेवाडी, झापाचीवाडी, राजुरी, हटकर मंगेवाडी, गौडवाडी, अजनाळे, जत, आटपाडी व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी सदाशिव चौगुले यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपली डाळिंब शेती यशस्वी करावी असा सल्ला दिपाली जाधव, सतीश पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला. सदाशिव चौगुले यांनी आपल्या शेतात डाळिंबाची १३/९ फूट अंतरावरती लागवड केली आहे. एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रावरती डाळिंब, सीताफळ, पेरू, शेवगा लागवड केली आहे.
















