सोलापूर : प्रसिद्ध समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांनी सोलापूर येथील ‘तरुण भारत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी “तरुण भारत परिवार मला माझ्या ‘माई’ कुटुंबासारखाच वाटतो” अशी आत्मिक भावना व्यक्त केले.
मुख्य संपादक प्रशांत माने यांनी ममताताईंचा व विनय सिंधुताई सपकाळ यांचा बुके, तरुण भारतच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रयज्ञ के 100 वर्ष विशेषांक आणि सोलापूरी चादर देऊन कौटुंबिक सत्कार केला.
याप्रसंगी मराठवाडा आवृत्ती विभाग प्रमुख राजाराम मस्के, मुख्य उपसंपादक अजितकुमार संगवे,धाराशिव जिल्हा प्रतिनिधी अनिल आगलावे, व्यवस्थापक विनायक पुला,जाहिरात व्यवस्थापक मनोहर बायनी,शिवाजी नाईट महाविद्यालयाचे दत्ताभाऊ भोसले,प्रतिभा झाडे,सत्यम गायकवाड, सागर पवार,रंजना घोडके, वैशाली कांबळे, अमोगसिद्ध मुंजे, श्रीनिवास गाजूल, नागसेन शिवशरण आदी उपस्थित होते.
भेटीदरम्यान ममता सपकाळ यांनी तरुण भारत प्रेसच्या सर्व विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची कार्यप्रणाली जाणून घेतली. संपादकीय, छपाई, वितरण आदी विभागांमध्ये त्यांनी पत्रकार व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
संपादकीय टीमच्या संवादप्रसंगी माईंच्या संस्थेद्वारा आजही तेच काम मोठ्या हिमतीने सुरु आहे जे माईंनी केले होते, समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि गरजू-अनाथ मुलांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांवर त्यांनी माहिती दिली. माध्यमांनी समाजातील सकारात्मक आणि रचनात्मक कार्यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
तरुण भारतच्या प्रतिनिधींनी ममताताई सपकाळ यांच्या कार्याचे कौतुक करून सामाजिक परिवर्तनासाठी माध्यमे आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र काम करण्याची गरज व्यक्त केली.
या सदिच्छा भेटीमुळे परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाली असून भविष्यात माईंचे सेवाकार्य आणि विविध सामाजिक उपक्रमांत संयुक्त प्रयत्न वाढण्याची आशावाद व्यक्त करण्यात आला.
















