भोकरदन : तालुक्यातील वाडी येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 30 जानेवारी रोजी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड येथील प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ व एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील ग्रंथपाल श्री. ज्ञानेश्वर हिलाले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. शिंदे होते, प्रा. अजय झिने, प्राध्यापिका सौ. मनीषा सोन्ने,प्रा. वाघमारे व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचा या समारंभात सहभाग होता.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. शिंदे यांनी पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी, शिक्षकांची मदत आणि मैत्रीच्या महत्त्वावर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या भावना ऐकून उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी त्यांना जीवनाच्या आगामी टप्प्यांसाठी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावापासून मुक्त राहण्याचे, आणि वर्षभराच्या अभ्यासलेल्या ज्ञानाला नीटपणे परीक्षेत मांडण्याचे निर्देश दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना पेपरात स्वच्छ आणि स्पष्ट अक्षरात लेखन करण्याचा सल्ला दिला.शाळेच्या परीक्षा सोबतच जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी होण्यासाठी चांगले संस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.
यावेळी स्पर्धा परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील ग्रंथपाल श्री. ज्ञानेश्वर हिलाले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईल ग्रस्त होत आहे. परीक्षेतील टक्केवारी, नैराश्य व भावनेच्या भरात विद्यार्थी आत्महत्या करतात. विद्यार्थ्यांनी खचून न जाता कसून अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे. यासाठी त्यांनी स्वतःचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात आयुष्य महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत पुस्तकाचे वाचन करावे.
पुस्तकातूनच अभ्यास करावा. अभ्यासासाठी मोबाईलचा हट्ट धरू नये. वडिलांचा मोबाईल अभ्यासाव्यतिरिक्त वापरू नये. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वखर्चाने मोबाईल ,मोटरसायकल,फोर व्हीलर गाडी,बंगला खरेदी करावा. ज्ञानाच्या बळावर विद्यार्थ्यांनी सुंदर जीवन जगावे असे मार्गदर्शन केले. “पुस्तकांचे वाचन करा, अभ्यास करा आणि मोबाईलच्या वापराबद्दल समजूतदार राहा.”असा सल्ला दिला.
प्रमुख मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात उत्तम भविष्य घडवण्यासाठी कणखर, मेहनती आणि योग्य मार्गावर राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना निरोप देताना, शालेय शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांचा यशस्वी आयुष्याच्या दिशेने वाटचाल सुगम होईल, असे प्राचार्य श्री. शिंदे यांनी सांगितले.
हा समारंभ दहावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने समारंभात भाग घेतला आणि भविष्यातील आघाडीवर निघण्यास प्रोत्साहित झाले.
समारंभाची समाप्ती विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी जीवनासाठी शुभेच्छा देऊन झाली. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा अंगीकार करण्याचे वचन दिले.
समारंभात उपस्थित दहावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,सर्वांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

























