मोहोळ – महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ या केंद्रास लड्डा उंटवाल महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे, यांनी भेट दिली. त्यावेळी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांच्या अडचणींवर काम करावे, शासनाला नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करावेत जेणेकरून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, कृषी विद्यापीठांनी शिक्षण संशोधन व विस्तार एकत्रितपणे समन्वयाने काम केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील शेतीला फायदा होईल, शेतकऱ्यांना काय हवंय त्यानुसार संशोधन व्हायला हवं त्यांच्या प्राधान्यक्रम नाविन्यपूर्ण अवजारे, बियाणे किंवा विविध पीक असू शकेल.
कृषी विज्ञान केंद्राने एक मॉडेल नैसर्गिक शेती द्वारे फळ किंवा पिकामध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी तयार करावं असं सुचवले.
याप्रसंगी डॉ. यशवंत साळे संचालक शिक्षण महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे हे देखील उपस्थित होते, सोबत डॉ.नितीन कुमार रणशूर प्रमुख शास्त्रज्ञ तथा सहयोगी संशोधन संचालक यांनी देखील कृषी विज्ञान केंद्र राबवत असणारे प्रकल्प याविषयी जाणून घेतले.
कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.तानाजी वळकुंडे यांनी सद्यपरिस्थितीमध्ये सुरू असलेले कृषी विज्ञान केंद्र मार्फत राबवले जाणारे प्रकल्प व कार्याचा आढावा याविषयी सादरीकरण केले.
श्रीमती लड्डा उंटवाल यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले व शेतकऱ्यांच्या शेतावरती सीड हब अंतर्गत बीज उत्पादन या विषयी जाणून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विशाल वैरागर व आभार प्रदर्शन श्रीमती काजल म्हात्रे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते



















