तभा फ्लॅश न्यूज/हदगाव : हदगाव शहरातील पाण्याची मोटर रिवायडींग, बोअर दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांकडून शेतकरी बांधव व सामान्य नागरिकांची बेफाम लूट चालु असून त्यांच्या मनमानी पुढे सर्वचजण हतबल झाले आहेत. मालकाची मजुरी, कारागिरीची मजुरी वेगळी अशी नामी शक्कल लढवत एखाद्या डॉक्टर पेक्षाही पाचपट जास्त यांची मजुरीची दर सामान्य नागरिक व शेतकरी वर लादत असून यांच्यामुळे शेतकरी बांधव व सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक जोमात होत असून याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे .
हदगाव शहरात मिळलेल्या माहितीनुसार अंदाजीत १५ ते २० दुकाने हे मोटार रिवायडींग चे आहेत . यांची कोणतीही प्रकारची युनियन अथवा संघटना नसल्याकारणाने यांच्या मनात आले तशी रक्कम ही नागरिकांकडून घेत आहेत .बोअरची सबमर्सिबल मोटर काढण्यापासून ते टाकण्यापर्यंतचे यांचे दर वेगवेगळे असतात तर शेतकरी बांधवांकडून मोटर रिवायडींग करण्याकरिता मोठ्या प्रमाणात रक्कम मनमर्जी प्रमाणे उकळली जाते.
काही नागरिकांनी तर थेट आरोप केला की , दुकानावर जाऊनच आम्हाला आपली मोटर तपासणी करावी लागते आणि इथूनच यांची मनमानी सुरू होते अमुक वस्तू गेली मोटार जळाली , बेअरिंग, बुश इत्यादी वस्तू टाकावे लागते असे सांगून मोकळे होतात. नागरिकांना त्यांना होकार दिल्याशिवाय पर्यायच राहत नसल्याने याचा फायदा काही मुजोर मोटर रिवायडींग दुकानदार घेत असून त्यांच्यावर आळा कोण घालणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर एक मतप्रवाह असाही आहे की, काम केले तर पैसे घ्यावे पण पूर्ण शहरात सरसकट एकच दर फलक राहावा जेणेकरून कुणाची लुबाडणूक होणार नाही.