बार्शी – तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२५ वर्षातील खरीप हंगामातील पिकासाठी हेक्टरी ३० हजार रुपये पीक विमा मिळावा. अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांना दिले आहे.
तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सन २०२५ मधील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने सोयाबीन व इतर पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते. या पिकांच्या नुकसानीमुळे राज्य शासनाने खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना अनुदान देखील देण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून खरीप हंगाम २०२५ मधील सोयाबीन व इतर पिकासाठी हेक्टरी ३० हजार रुपये पिक विमा मिळावा, अशी मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांना राहुल भड, अशोक माळी, उमेश सुतार, संजय माळी, महेश भड आदी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

























