तभा फ्लॅशन्यूज – सहयोग प्र.जावळे : केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत ‘अॅग्रीस्टॅक’ (Agristack) योजना राबविण्यात येत असून, महाराष्ट्र राज्यातही ही योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शेतजमिनींचा आधार संलग्न माहिती संच (Farmers Registry) तयार केला जात आहे.
या योजनेतून पिक विमा योजना, पीएम किसान योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान यासह सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.
कन्नड तालुक्यातील आतापर्यंत 68,281 शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केले आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सीएससी सेंटर, महा ई-सेवा केंद्र येथे जाऊन 7/12 उतारा व आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. ज्यांनी अद्याप फार्मर आयडी केलेला नाही, त्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.