तभा फ्लॅश न्यूज/शिवप्रसाद दाड : बदनापूर तालुक्यातील अंबडगाव, धोपटेश्वर, गेवराई बाजार व गोकुळवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही माहिती मिळताच बदनापूरचे तहसीलदार मा. हेमंत तायडे यांच्याशी संपर्क साधून स्थानिक पदाधिकारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंबडगाव, धोपटेश्वर, गेवराई बाजार व गोकुळवाडी शिवारात पाहणीदरम्यान शेतकरी शुभम प्रभाकर कान्हेरे, दिनेश नारायण कान्हेरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांसारखी हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
या पाहणीवेळी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती घेऊन प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे, शेतकऱ्यांना शासकीय मदत व अनुदान देण्याचे तसेच नुकसान भरपाई त्वरीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले गेले.