अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर जवळील हॉटेल नॅशनल धाबा(उमरगा चिवरी पाटी) जवळ धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव-उळे येथील असल्याचे समजते.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील चिवरी पाटीजवळील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. क्रुझर गाडीचे अचानक टायर फुटल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला जोरात आदळली. या भीषण धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर गाडी प्रवासी घेऊन तुळजापूरकडे जात असताना चिवरी पाटी परिसरात मागील टायर अचानक फुटला. टायर फुटल्याचा मोठा आवाज आणि वाहनाची घसरगुंडी होताच गाडीतल्या प्रवाशांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. धडक इतक्या जोरदार होती की गाडीचे पुढचे व मागचे दोन्ही भाग क्षणात चकनाचूर झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस तसेच तातडीची मदत पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतदेह सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.



















