तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला जातो, त्यासाठी आंदोलने उभारली जातात, वृत्तवाहिन्यांवर त्याबाबत चर्चासत्रे भरवली जातात आणि या सर्वांतून चित्रपटाला फुकटची प्रसिद्धी मिळते आणि लोकं चित्रपटात नेमकं आहे तरी काय हे पाहण्यासाठी चित्रपट गृहाच्या बाहेर गर्दी करतात. अशा प्रकारचे फॅड गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहे. ‘खालिद का शिवाजी’ हा सुद्धा त्यापैकीच एक चित्रपट. आज या चित्रपटाला समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.
या चित्रपटाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण केले गेल्याचा आरोप या चित्रपटावर होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाचा सोळाव्या वर्षी रायरेश्वराला स्मरून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. पाच यवनी पातशाह्यांना त्यांनी नेस्तनाबूत केले. या सर्वांत त्यांना साथ लाभली ती देव, देश आणि धर्मासाठी प्रसंगी प्राण अर्पण करणाऱ्या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची. ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ अशी प्रतिज्ञा घेणारे तानाजी मालुसरे, ‘शत्रूस धुळीस मिळवल्याशिवाय राजे तुम्हाला तोंड दाखवणार नाही’ असा पन करून हजारो यवनी सैनिकांवर तुटून पडलेले स्वराज्याचे सात शिलेदार, ‘राजे तुम्ही गडावर पोहोचल्याशिवाय हा बाजी प्राणही त्यागणार नाही’ असे आश्वासन देणारे बाजीप्रभू देशपांडे, यांसारख्या अनेक पराक्रमी मावळ्यांच्या कथा इतिहासाच्या पुस्तकातून वाचून आपण सर्वच जण लहानाचे मोठे झाले आहोत.
शालेय अभ्यासक्रमाच्या कोणत्याही पुस्तकात शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लिम होते आणि महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते असे आजतगायात शिकवण्यात आलेले नाही मग या चित्रपटासाठी हा शोध कुठून लागला? असा प्रश्न यानिमित्ताने हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारला जात आहे. महाराजांनी रायगडावर मशिद उभारल्याचा दाखल कोणत्याही ऐतिहासिक दस्तावेजात नाही मग या चित्रपटात या बाबी घुसवून महाराजांना हेतुपुरस्सर पंथनिरपेक्ष ठरवण्याचा प्रयत्न का केला जात आहे असाही सवाल केला जात आहे. उलट ‘शिवकालीन पत्रां’मध्ये महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी परकीय आक्रमकांशी कोणतीही तडजोड केली नाही, याचे स्पष्ट उल्लेख आढळतात. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या या चित्रपवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववाद्यांकडून केली जात आहे.
जर मुस्लिम समाजाला खरेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम असते, तर पाच मुसलमान पातशाह्यांनी त्यांना संपवण्याचा चंग बांधला नसता किंवा छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले नसते. सध्याच्या काळातही जर मुसलमान समाजाला शिवाजी महाराजांप्रती आदर असता, तर यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथे झालेल्या हिंसाचारात ‘सय्यद’ नावाच्या धर्मांध व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली नसती.
त्यामुळे ‘‘खालिद का शिवाजी’’ हा चित्रपट हिंदू समाजात भ्रम निर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांचे खोटे चित्रण करणारा आहे. असा आरोप हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला असून या वित्रपटाच्या विरोधात जन आंदोलन छेडले आहे. ज्याप्रमाणे ‘‘उदयपूर फाइल्स : कन्हैय्यालाल टेलर मर्डर’’ या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली, त्याचप्रमाणे ‘‘खालिद का शिवाजी’’ या चित्रपटामुळे दुखावलेल्या शिवप्रेमी जनतेच्या भावनांची दखल घेऊन या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी समितीने केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन सर्वच पंथियांचा आदर केला आहे, याचा अर्थ ते पंथनिरपेक्ष होते असा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मुस्लिम समाजाला एव्हढाच आदर आहे तर वर्षातून दोन वेळा राज्यासह देशभरात साजरे होणारे शिवजयंती महोत्सव किती मुस्लिम मोहल्यांमध्ये साजरे केले जातात ? किती मुस्लिमांच्या घरात शिवरायांच्या तसबिरी किंवा मूर्ती आहेत असाही सवाल यानिमित्ताने हिंदुत्ववाद्यांकडून विचारला जात आहे त्यामुळे लोकभावनांची वेळीच दखल घेऊन खालिद का शिवाजी या चित्रपटावर सरकारने बंदी आणावी आणि शिवप्रेमीना आश्वस्त करावे अशी मागणी एकमुखाने होत आहे !