सोलापूर – राज्यात हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीला मान्यता मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली असून दि.३० ऑक्टोबरपासून शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर दि.१५ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याचे सोलापूर जिल्हा पणन अधिकारी मनोज वाजपेयी यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळावा, यासाठी अखेर जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांना सुरुवात होत आहे. मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांच्या खरेदीसाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण ७ हमीभाव खरेदी केंद्रास शासन मान्यता मिळाली आहे. त्यानुसार बार्शी, अक्कलकोट, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, या सात ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पाच खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर माढा आणि माळशिरस तालुक्यासाठी खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. नोंदणी प्रक्रियेनंतर हमीभावाने सोयाबीन मूग आणि उडीद याच्या खरेदीने शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, बार्शी तालुक्यासाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र सुरू करण्यात आले आहे. तुळजाभवानी कृषी साधन व पुरवठा सहकारी संस्था मर्या, उंबरगे. या संस्थेच्या माध्यमातून ही प्रक्रिया चालवली जाणार आहे.
करमाळा तालुक्यासाठी करमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विठ्ठल सर्वसाधरण सहकारी संस्था मर्या, मांगी. या संस्थेच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
माढा तालुक्यासाठी कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. माढा संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यासाठी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. पंढरपूर या संस्थेच्या वतीने खरेदी केंद्र चालवले जाणार आहे.मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मंगळवेढा या संस्थेच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. माळशिरस तालुक्यासाठी अकलुज येथे शेकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि, अकलुज. संस्थेच्या मार्फत हमीभाव खरेदी केंद्र चालवले जाणार आहे. तर अक्कलकोट तालुक्यासाठी अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वि.का. सेवा. सहकारी सोसायटी मर्या. किणी. संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
राज्य शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०२५-२६ हंगामासाठी या केंद्रांना सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी नोंदणी करता यावी, यासाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.मात्र, या केंद्रांना उशिराने प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. आता केंद्र सुरू झाल्याने योग्य दराने विक्रीची संधी उपलब्ध झाली आहे.
– मनोज कुमार बाजपेयी, जिल्हा पणन अधिकारी
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
चालू वर्षातील सोयाबीनची ई-पीक नोंद असलेला डिजिटल ७/१२ व ८-अ उतारा
आधार कार्ड
राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती येथील केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
चौकट
केंद्र शासनाने निश्चित केलेले आधारभूत किंमत किती?
मूग : ८,७६८ रु. प्रति क्विंटल
उडीद : ७,८०० रु. प्रति क्विंटल
सोयाबीन : ५,३२८ रु. प्रति क्विंटल
नोंदणी प्रक्रिया
* नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन मशीन द्वारे केली जाणार असून, शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे.
* नोंदणीनंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना मिळाल्यावरच माल विक्रीसाठी केंद्रावर आणावा, असे निर्देश दिले आहेत.
* शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उशिरा का होईना, पण हमीभाव खरेदी केंद्रांमुळे
* शेतकऱ्यांच्या हातात योग्य दराचा हमीचा आधार मिळणार आहे.
राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने दिली आहे. पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यात नाफेड आणि एनसीसीएफसाठी सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. सोयाबीनचा हमीभाव केंद्र सरकारने यंदा प्रति क्विंटल ५३२८ रुपये जाहीर केला. तसेच मुगाचा व उडदाचा हमीभाव प्रत्येकी ७७६८ रुपये व ७८०० रुपये जाहीर केला आहे.शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने पाॅस मशिनद्वारे करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बॅंक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा, पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरिता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे.
























