सोलापूर : शहरातील दमाणी नगर परिसरातील जुना रेल्वे ब्रीज (पूल) पाडकामाची प्रक्रिया रेल्वे विभागाकडून सुरू झाल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सज्ज करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर ५४ मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे सर्व सुविधांसह शुक्रवारी सकाळी हा पर्यायी ५४ मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी वेळेत करून दाखवले
रेल्वे प्रशासनाकडून रविवार दि. १४ डिसेंबर रोजी १०३ वर्षे जुना रेल्वे पुल पाडकामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ठिकाणाहून होणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने यासाठी महापालिकेकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अनुषंगाने गेली अनेक वर्षे रखडलेले ५४ मीटर रस्त्याचे काम देखील युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले. वाहनधारकांसाठी रस्ता डांबरीकरण, दिवाबत्तीची सोय आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व त्या उपाययोजना पूर्ण करून रस्ता शुक्रवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
दरम्यान, यानंतर आता या मार्गावरून वाहतूक सुरू झाली असून सायंकाळ पासून वर्दळही वाढली आहे. या मार्गावरील आणखी विविध कामे पूर्ण करण्यासाठी अद्यापही महापालिकेची नगर अभियंता, झोन कार्यालय आणि विद्युत विभागाची टीम कार्यरत आहे. शिवाय अतिक्रमण विभागाकडून शिल्लक राहिलेले अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील अजोरा आणि पडलेले कचऱ्याचे ढीग पाठविण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहेत. रस्ता सर्वांसाठी खुला झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस या मार्गावरून वाहतूक सुरू झाल्याने शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार
रेल्वे ब्रिज पाडण्यापूर्वीच रस्त्याचे काम फत्ते
सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या ५४ मीटर रस्त्याच्या कामाची अनेक वेळा प्रत्यक्ष पाहणी केली होती. रस्त्याची सध्याची स्थिती, कामाचा वेग, मुरूम व डांबरीकरणाची प्रगती याबाबत माहिती घेत रेल्वे ब्रिज पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरु करावा. कामात कोणताही विलंब होऊ नये, गुणवत्ता आणि सुरक्षा निकष पाळून कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कंत्राटदारास दिले होते. अखेर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार रेल्वे ब्रिज पाडण्यापूर्वीच हे काम फत्ते झाले. अखेर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा ५४ मीटरचा रस्ता सर्वांसाठी खुला करण्यात आला.
—–


























