पंढरपूर – शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नवी पेठ येथील अर्बन बँक मुख्य इमारतीच्या पाठीमागे असलेल्या ओम अॅग्रो या खत दुकानात बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्काळ अग्रिशामक दल दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगी मध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी जिवीतहानी मात्र झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नवीपेठ परिसरात ओम अॅग्रो हे दुमजली दुकान आहे. दुकानांमध्ये खत व कृषी विषयक औषधे होती.या दुकानात बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले. धुराचे हे लोट तसेच दुकानाला लागलेली आग पाहून नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधला. तात्काळ अग्निशामक दल दाखल झाले. आगीच्या या घटनेची माहिती नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन अग्निशामक दलांना सूचना केली.
अग्निशामक दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र या आगीत दुकानातील खते, बियाणे, कीटकनाशक यांचे गोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुकानातील कीटकनाशकाच्या बाटल्या आगीमुळे फुटत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने असल्यामुळे अनर्थ घडू नये म्हणून अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली.
यामुळे मोठा अनर्थ टाळला. आगीमध्ये दुकानातील खते, बियाणे, कीटकनाशक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र कोणतीही जिवितहानी झाली नाही. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

















