बार्शी – सोलापूर विमानतळ येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी प्रथमोचार (First Aid) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक श्री शिवाजी महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्राचे माजी प्राध्यापक व श्रीमान रामभाई शाह ब्लड सेंटर, बार्शीचे मानद सचिव, डॉ. दिलीप कराड यांनी संपूर्ण प्रशिक्षण प्रभावीपणे घेतले. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि योग्य प्रतिसाद देण्याबाबत जागृती निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन विमानतळ संचालक श्री. माधवराव सोनकुसळे यांनी केले. तसेच सिव्हील इन्चार्ज व उपमहाव्यवस्थापक श्री. चंद्रेश वंजारा यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. डॉ. दिलीप कराड यांना डॉ. चैताली मोरे व सौ. अनुराधा फोके यांनी सहाय्य केले.

सोलापूर विमानतळाचे अग्निशमन सेवा अधिकारी निशांत म्हात्रे, तुकाराम दराडे, व शिवानंद म्हामणे (वरिष्ठ अधीक्षक, अग्निशमन सेवा) यांनी प्रशिक्षणाच्या संपूर्ण समन्वयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आवश्यक सुविधा, जागेची उपलब्धता आणि व्यवस्थापन सुरळीत पार पडण्यासाठी त्यांनी सक्रीय सहकार्य केले.
प्रशिक्षणादरम्यान डॉ. कराड यांनी बेसिक लाइफ सपोर्ट, जखमांवरील तात्काळ उपचार, रक्तस्त्राव नियंत्रण, श्वसनअडथळा दूर करण्याच्या पद्धती, तसेच आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.
सोलापूर विमानतळ प्रशासनाने या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून डॉ. दिलीप कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे प्रशिक्षण कर्मचारी अधिक सजग, प्रशिक्षित आणि सक्षम होण्यासाठी उपयुक्त ठरले, असे मत व्यक्त केले.



















