सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने निवडणूक खर्च समितीच्या वतीने आज इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे उमेदवार खर्चाची प्रथम तपासणी व ताळमेळ सत्र यशस्वीरीत्या पार पडले. या विशेष कॅम्पमध्ये उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाचा तपशील व संबंधित बँक स्टेटमेंटची तपासणी करण्यात आली.
मुख्य लेखाधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर आणि सहनोडल अधिकारी सदानंद वाघमोडे यांनी उमेदवारांना खर्च नोंदवही भरण्याची पद्धत, खर्चाचे वर्गीकरण, पावत्या व बिलांचे जतन, बँक स्टेटमेंटचा ताळमेळ आणि खर्च मर्यादेचे पालन याबाबत मार्गदर्शन केले. खर्च वेळेत व अचूक सादर न केल्यास नियमांनुसार कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले.
विविध प्रभागांतील उमेदवार व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक उमेदवाराने खर्चाची स्वतंत्र नोंद ठेवणे, नोंदवही अद्ययावत ठेवणे आणि सर्व खर्च अधिकृत बँक खात्यातूनच करणे बंधनकारक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या कॅम्पमुळे खर्च सादरीकरणाची प्रक्रिया सुलभ झाली असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत झाली आहे. निवडणूक खर्च समितीच्या वतीने दुसरा तपासणी कॅम्प दि. १२ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी जयंत क्षीरसागर, अमर काळे यांच्यासह समितीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















