बार्शी – नगरपालिके पाठोपाठ ग्रामीण भागातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या आणि नेते घडवणारी फॅक्टरी म्हणून ओळख असलेल्या झेडपी अन पंचायत समितीचे आरक्षण देखील निश्चित झाले आहे. बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणात चुरशीच्या लढती होणार आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले असल्याने तालुक्यातील बारापैकी महिलेसाठी आरक्षित असलेल्या उपळाई ठोंगे, मालवंडी आणि मानेगाव या पंचायत समिती गणनातून विजयी होणारी महिला सभापतीपदी विराजमान होणार आहे. झेडपीच्या सहापैकी चार गटात महिलांचे आरक्षण पडल्याने आणि उपळाईत ओबीसी आरक्षण असल्याने पानगाव हा एकमेव गट खुला राहिला आहे. त्यामुळे अनेक दावेदारांच्या आशेवर मात्र पाणी फेरले गेले आहे.
बार्शी तालुका पंचायत समितीवर गेल्या वीस वर्षापासून माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे एकहाती वर्चस्व आहे. मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राऊत गटाचे सात तर सोपल गटाचे पाच पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. झेडपीच्या मात्र दोघांच्या प्रत्येकी तीन जागा विजयी झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीवरुन ग्रामीण भागात कोणाचे वर्चस्व आहे हे सिद्ध होणार आहे.
राऊत गटाच्या सत्तेच्या कार्यकाळात सभापती म्हणून अनिल डिसले यांनी काम पाहिले. आजच्या आरक्षण सोडतीमध्ये आणि मातब्बर भावी आणि इच्छुक उमेदवाराचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेकांच्या आशेवर मात्र पाणी पेरले गेले आहे. उपळाई ठोंगे पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. या सोबतच नव्याने स्थापन झालेल्या मानेगाव आणि मालवंडी हे तीन गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले आहेत. या सोबतच गौडगाव, बावी, पानगाव व सासुरे या सर्वसाधारण असलेल्या मतदारसंघातून देखील महिला उभा करुन सभापती केले जाऊ शकते.
उपळाई पंचायत समिती गणातून दोन्ही पक्षाकडून विजय ठोंगे, शंकर मांजरे, आबासाहेब ठोगे, देवगावचे शंकर मांजरे, धस पिंपळगावचे हनुमंत धस आणि दादा मांजरे संभाव्य उमेदवार असू शकतात तर मालवंडी पंचायत समिती गणात देखील बाळासाहेब काकडे, बाबा काटे, शिवसेनेचे प्रवीण काकडे, प्रमोद शेळके, उमेश क्षीरसागर, रवी साळुंखे यांच्या घरातील महिला उमेदवार असू शकते. तर मानेगाव गणात ही मेजर सुखदेव जगताप, भास्कर काशीद, सुभाष शेळके, झुंबर जाधव, साहेबराव देशमुख इच्छुक आहेत.
सहा झेडपीमध्ये पांगरी आणि मालवंडी व शेळगाव सर्वसाधारण महिला आरक्षित झाले आहे. पानगाव हा एकमेव झेडपी गट सर्वसाधारण झाला आहे. उपळाईमध्ये ओबीसी आणि उपळे दुमाला मध्ये ही ओबीसी महिला असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे अनेक मातब्बर इच्छुक थंड पडले आहेत. विद्यमान झेडपी सदस्यांपैकी एकही पुन्हा मेंबर होऊ शकणार नाही. खरी तुल्यबळ लढत ही पानगाव झेडपीमध्ये असणार आहे. या गटात सदानंद गाडे, राजाभाऊ सुरवसे, बाबा कापसे, ऍड विकास जाधव, मनोज पाटील, सुधीर काळे यांच्यापैकी उमेदवार असतील.