पंढरपूर – मराठी नववर्षारंभ अर्थात गुढी पाडव्या निमित्त श्री विठ्ठल मंदिरात सकाळी सात वाजता ध्वज पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी विठ्ठल रुक्मिणीस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
मराठी नवीन वर्षाचा शुभारंभ होत असून यानिमित्त विठ्ठल मंदिरात पारंपरिक भगवा ध्वज पूजन करण्यात आले. सकाळी सात वाजता मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले आणि समिती सदस्याच्या उपस्थितीत ध्वज पूजन संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ, सहाय्यक विभाग प्रमुख प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी उपस्थित होते.
या शिवाय, श्री संत नामदेव पायरीवरील (महाद्वारावरील) गोपूर, श्री रुक्मिणी उत्तरद्वार गोपुर, या ठिकाणी विधिवत पूजा करून ध्वज लावण्यात आले. सकाळी पंचांग पूजन करण्यात आले. मंदिर समितीचे पुजारी वेद शास्त्र संपन्न समीर कौलगी यांनी पंचांग वाचन केले. या दिवसापासून श्रींचे महानैवेद्यामध्ये श्रीखंडाचा समावेश करण्यास सुरवात करण्यात येत असून, दुपारी पोशाखावेळी श्रींस अलंकार परिधान करण्यात आले.
————-
विठुरायाला साखरेचा हार
गुढीपाडव्याच्या निमित्ताने विठुरायाला आज साखरेचा आणि खोबऱ्याच्या वाटीचा हार परिधान करण्यात आला आहे. त्यामुळे देवाचे सोज्वळ रूप अधिकच खुलून दिसत होते.
——————-
या पारंपारिक दागिन्यांचा समावेश
चैत्री पाडव्या निमित्त विठुरायाला रेशमी गुलाबी सोवळे आणि निळ्या रंगाची अंगी परिधान करण्यात आली होती. तर देवाला सोन्याची पगडी, कौस्तुभमणी, हिऱ्याचे कंगन जोड, दंडपेट्या जोड मोठा,नाम निळाचा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी,नवरत्नांचा हार,तुळशीमाळ,मत्स्त्य जोड, पितांबर, असे अलंकार तर रखुमाईला चिंतामणी रंगाची नऊवारी रेशमीसाडी, सोन्याचा मुकुट,वाक्या जोड,तोडे जोड,तानवड जोड, चिंचपेटीतांबडी,मोहरांची माळ,पुतळ्याची माळ,हायकोल,लक्ष्मीहार,सरी, कंबरपट्टा आदीं पारंपारिक दुर्मिळ अलंकराने सजविण्यात आलेले होते.


























