सन २००१ मध्येच संसदेवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या स्मरणदिनीच सहा जणांनी नवीन संसदभवानातील सुरक्षा व्यवस्था भेदल्याने बुधवारी एकच खळबळ उडाली. या घुसखोर तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्यावरही खासदारांच्या बैठक बाकांवर गोंधळ घातला. त्यामुळे प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुनही तरुण जायबंदी न झाल्यामुळे गॅलरीची रचना सदोष आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
लोकसभेचे कामकाज सुरु असताना काही तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहातच घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच खासदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. सभागृहातील शेकडो खासदारांच्या मधोमध जाऊन या तरुणांनी जी पिवळा रंग फवारला.त्यामुळे खासदारांनी धास्ती घेतली आहे. मात्र, नवीन संसद भवनात घुसखोर तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारुनही ते जायबंदी कसे झाले नाहीत, सभागृहातील प्रेक्षक गॅलरीची उंची कमी असल्याने रचना सदोष झाली आहे का असे प्रश्न बुधवारी झालेल्या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
प्रेक्षक गॅलरीची रचना सदोष?
तरुणांनी लोकसभेत सभागृहात बुधवारी उड्या मारल्या, त्या नवीन प्रेक्षक गॅलऱ्या बैठकव्यवस्थेपासून जेमतेम पाच ते सहा फूट उंचीवर आहेत. प्रेक्षक, पत्रकार व विशेष अभ्यागतांच्या गॅलऱ्या आणि प्रत्यक्ष सभागृह यांच्यामध्ये जे जेमतेम सहा फुटांचे अंतर असल्याने त्यात कोणतीही व्यक्ती सभागृहात सहज उडी मारू शकते. अनेक खासदारांच्या मते जुन्या संसदेची रचना जास्त सुरक्षित होती. तिथल्या प्रेक्षक गॅलऱ्या इतक्या उंचीवर होत्या, की कोणी सभागृहात उडी मारली तर तो जायबंदीच होणार अशा दृष्टीने रचना होती. या गॅलरीच्या पहिल्या रांगेत सुरक्षा रक्षक बसलेले असत व त्यांचे प्रत्येक प्रेक्षकाकडे बारकाईने लक्ष असे. कोणी साधी हालचाल केली किंवा पायावर पाय ठेवून बसले तरी हे सुरक्षा रक्षक तत्काळ त्यांना तंबी देत. नवीन संसदेत ही रचनाच काढली गेली आहे असे खासदारांनी सांगितले
सुरक्षा व्यवस्थेत मनुष्यबळाची कमतरता
पूर्वी संसदेत ‘वॉच अॅण्ड वॉर्ड’ अशी स्वतंत्र यंत्रणा होती. ती प्रामुख्याने लोकसभेबाबत कार्यरत असे. मात्र, काही वर्षांपूर्वी ती बरखास्त करून एकच संसदीय सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात आणली.परंतू, या यंत्रणेतही मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन संसदेत कामकाज सुरू झाल्यावर कामाचा ताण दुप्पट वाढला असून सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या आहे तेवढेच राहिली .
सध्याच्या स्थितीत किमान १०० सुरक्षारक्षक तातडीने नेमण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभाध्यक्षांकडे पाठवला असून त्या प्रस्तावालाही वर्ष झाल्याचे सांगितले जाते. संसदीय सुरक्षा यंत्रणेचे संचालक अगदी नवे आहेत. ज्यांच्याकडे याची मुख्य जबाबदारी दिली आहे, त्या सहसंचालकांचे पद गेले काही महिने रिक्तच आहे. सभापतींच्या मार्शलची व सुरक्षारक्षकांची वेशभूषा बदलणे यासोबतच आमच्या या गंभीर प्रश्नांची दखल यंत्रणा कधी घेणार असा सुरक्षारक्षकांचा प्रश्न आहे.