बारामती : प्रकाशाचा आणि आनंदाचा सण दीपावली साजरा करताना नागरिकांनी वीज वापरताना विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवे, सजावट, फटाके आणि विद्युत उपकरणे वापरताना निष्काळजीपणामुळे अपघात होऊ शकतात. तरी दीपावलीचा आनंद साजरा करताना वीज सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे सर्व नागरिकांना महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे.
विद्युत सुरक्षेसंदर्भात खालील काही महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत. सुरक्षित वीज वापर : विद्युत रोषणाई व आकाशदिव्यांसाठी वापरण्यात येणारे विजेची वायर्स, प्लग, मल्टी-प्लग, एक्स्टेंशन बोर्ड इत्यादी योग्य दर्जाचे आणि आयएसआय प्रमाणित असावेत. अधिक भार टाळा: एका सॉकेटमध्ये अनेक उपकरणे जोडू नका. त्यामुळे वायरिंगवर अधिक भार येऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता वाढते. ओलावा टाळा : विजेच्या तारा आणि जोडणी ओलसर ठिकाणी ठेवू नका. पाण्याच्या संपर्कात आल्यास विजेचा धक्का बसण्याचा धोका संभवतो. विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवा: फटाके फोडताना विद्युत खांब, तारा, ट्रान्सफॉर्मर यांच्या जवळ जाणे टाळावे. अपघात झाल्यास तत्काळ संपर्क: कोणताही विजेसंबंधी अपघात झाल्यास त्वरित स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर 1800-233-3435, 1800-212-3435, 1912 संपर्क साधावा. विद्युत सुरक्षा नियम पाळून सुरक्षित आणि प्रकाशमय दीपावली साजरी करूया.