सोलापूर :- अनिता फौंडेशन या सामाजिक संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली. समाजातील वंचित, उपेक्षित व गरजू घटकांच्या उन्नतीसाठी ही संस्था कार्य करणार असल्याची माहिती संस्थापकांकडून देण्यात आली. संस्थेच्या स्थापनेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर परिसरात भिक्षेकरी, वृद्ध, अपंग आणि गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे 100 गरजू व्यक्तींना भोजन देऊन त्यांच्या अन्नाची गरज भागवण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
अनिता फौंडेशन समाजातील विविध प्रश्नांवर काम करत गरजू व्यक्तींना आधार देण्यासोबतच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिला सक्षमीकरण, युवक-युवती मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, तसेच अबालवृद्धांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे दुःख कमी करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी मदत करणे हा आहे. भविष्यात आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, रोजगार मार्गदर्शन, आणि आपत्तीग्रस्तांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजनही संस्थेकडून करण्यात येत आहे.
या अन्नदान कार्यक्रमास अनिता झेंडेकर, संस्थेचे अध्यक्ष किशोर झेंडेकर, सचिव मलेशम कारमपुरी, सदस्य गणेश भोईटे, रुपाली झेंडेकर, विजय सांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.























