तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड शहापूर दि. 3 जुलै शाळेच्या दुरुस्तीसाठी अंबड तालुक्यातील दाढेगावच्या ग्रामपंचायत सदस्याने शाळेच्या पत्रांवर बसून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामुळे या उपोषणाची चर्चा सर्वत्र सुरू असून, शिक्षण विभाग याकडे लक्ष देईल का, असा प्रश्नही आता गावकऱ्यांसह पालकांना पडला आहे.
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य राजू दशरथ काकडे यांनी अंबडच्या गटशिक्षणधिकाऱ्यांना १८ जून रोजी निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दाढेगाव येथील जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आलेली आहे. शाळेवरील पत्रे पूर्णपणे जीर्ण व पावसाळ्यात गळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. जीर्ण झालेली इमारत कधीही कोसळू शकते. यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तरीही
प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी आज २ जुलैपासून शाळेच्या पत्र्यावर बसून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ग्रामस्थही त्यांच्यासोबत आहेत. आगळ्या-वेगळ्या उपोषणाची चर्चा आहे.