सोलापूर – राज्याचा सर्वत्र विकास होत असताना, आपल्या शहराचा गावाचा विकास होण्यासाठी भाजप आवश्यक आहे. त्यामुळेच अनेक नेते मंडळी भाजपसोबत जोडले जात आहेत. या नव्या नेतेमंडळींचा भाजप पक्षामध्ये मान सन्मान राखला जाईल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. भाजपचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास विकास कामांपासून प्रभावित होऊन त्यांनी आपल्या प्रभागाचा शहराचा विकास होण्यासाठी भाजप सोबत येण्याचे पसंत केले आहे. एकेकाळी सोलापूर शहरातून राज्याचे राजकारण काँग्रेस पक्ष करायचा. परंतु आता पक्ष तसेच पक्षावरील विश्वास संपत चालला आहे. आपल्या प्रभागाचा विकास करणे शक्य होणार नाही. निधीची पूर्तता होणार नाही. या बाबी लक्षात घेऊन आज माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला आहे. केवळ भाजपच आपल्या प्रभागाचा आणि शहराचा विकास करू शकतो ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे.
पुढे ते म्हणाले की, राजकारणामध्ये काही गोष्टी बोलायच्या नसतात, त्या करून दाखवायच्या असतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आमच्याकडून जास्त काही वदवून घेऊ नये. अशी मिष्किल टिप्पणी देखील त्यांनी केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले.
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर लक्षात घेता, भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर शहरात पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष तथा आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ.देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून ऑपरेशन लोटस यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनी मुंबईमध्ये भाजप पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आता सोलापूर शहरात माजी नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर पक्ष प्रवेश केला आहे. काँग्रेसचे कट्टर नगरसेवक समर्थक विनोद भोसले, माजी उप महापौर प्रवीण डोंगरे यांसह ओम दीपक राजगे, रविकांत कांबळे यांनी देखील भाजप पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला आघाडीचे अध्यक्ष रंजीता चाकोते, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शहाजी पवार आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
काँग्रेसचे कट्टर समर्थक राहिलेले माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी भाजप पक्ष प्रवेश करताना विकासाचा मुद्दा समोर आणला आहे. विनोद भोसले म्हणाले, देशात आणि राज्यात भाजप पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे विकासासाठी सत्ता आवश्यक आहे. प्रभागाचा विकास होणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळामध्ये काँग्रेस कमबॅक करेल असे वाटत नाही. केवळ विकासाच्या उद्देशाने भाजपसोबत जाण्याचा विचार केला आहे. यापूर्वी ज्या पक्षात आम्ही घडलो. त्या पक्षाबद्दल आणि पक्षश्रेष्ठी बद्दल मी ऋणी आहे. आमचे सहकारी नगरसेवक नरोटे यांना देखील माझा सल्ला असणार आहे. विकासासाठी भाजपसोबत येण्याचे आवाहन देखील यानिमित्ताने करत आहे. भाजप पक्षातील श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. असे देखील विनोद भोसले यांनी आवर्जून सांगितले.
माजी महापौर प्रवीण डोंगरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना पाणीपुरवठा शहराचा आत्मा आहे. शहराचा विकास आणि पाणीपुरवठ्याचे कामकाज पूर्ण होण्यासाठी निधी तसेच सत्ता असणे आवश्यक आहे. केवळ विकासाच्या मुद्द्यावर भाजप पक्षांमध्ये प्रवेश करत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पायगुण चांगला आहे. त्यांच्यामुळे आम्हाला आणखीन एक विकासाच्या वाटेवर जाता येणे शक्य होणार आहे. असे देखील डोंगरे यांनी यावेळी म्हटले.
भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना, भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेल्या विनोद भोसले, प्रवीण डोंगरे, ओम राजगे, रविकांत कांबळे यांचे सहर्ष स्वागत केले. भाजप हा विकासाच्या मुद्द्यावर चालणारा पक्ष आहे. अनेक नेते मंडळी आमच्या सोबत आमच्या कुटुंबात सामील होत आहेत.पक्षांमध्ये त्यांना मानसन्मान मिळेल. पालकमंत्री तसेच शहराच्या आमदारांसोबत एकत्रित येऊन शहराचा विकास साधू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


























