धाराशिव – शहरातील आयुर्वेदिक कॉलेज परिसरातील उड्डाणपुलावर भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्यूनर कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त फॉर्च्यूनर कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते. हे सर्व प्रवासी वाशी तालुक्यातील तेरखेडा गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. उड्डाणपुलावरून जात असताना वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या अपघातामुळे काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. वेगावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

















