त. भा. , दि. १०
वाळूज महानगर (प्रतिनिधी) :
सिडको वाळूज महानगरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीतील घरफोड्यांच्या चार दिवसांतच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा, गुन्ह्यात वापरलेली जीप , चोरीतील ऐवज असा एकूण सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाळूज महानगरातील वास्तुवैभव अपार्टमेंटमध्ये जगदीश गोविंदराव कुलकर्णी यांच्या घरात दि. ४ रोजी भर दिवसा कडी कोयंडा तोडून प्रवेश केला होता यावेळी कुलकर्णी हे घरी आले असता घरात दोन अनोळखी व्यक्ती साहित्य अस्ताव्यस्त करीत असल्याचे आढळले होते. तेव्हा कुलकर्णी यांनी या अनोळखींना हटकले. परंतु, त्यांनी कुलकर्णी यांना धक्का देऊन पळ काढत घरासमोर उभ्या केलेल्या काळ्या रंगाच्या जीपमध्ये बसून पसार झाले होते.
या घटनेत सोन्याचे दागिने व रोख १२ हजार रूपये असा एकूण १ लाख ४२ हजाराचा ऐवज चोरून नेला होता . या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन घरफोड्यांविरुध्द वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खबऱ्यांना कामाला लावले होते.
भरदिवसा चोरी करणारे चोरटे आंतरराज्य टोळीतील असून ते शहरात बंद घराची रेकी करुन घरफोडी करीत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. या दरम्यान, रविवारी (ता. ८) सांयकाळी या टोळीतील काही घरफोडे नगर नाक्यावरुन काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसून वाळूजच्या दिशेने येत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांना मिळाली.
पोलिसांनी लिंकरोड चौफुलीवरील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. तेव्हा सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित चोरटे जीपमध्ये दिसताच पोलीस पथकाने अडवून चौघांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा, स्कार्पिओ जीपसह एमएच ०१, बी. वाय.५७६३, व एम.एच.०१, बी.यु. ८८३९) या दोन नंबर प्लेटसह घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सिडकोमधील घरात चोरी केल्याचे कबूल केले.
तसेच ही आंतरराज्य टोळी कार्यरत असून दिवसा रेकी करुन बंद घरे फोडून चोरी करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या आंतरराज्य टोळीत सचिन बलभीम कोळपे (४३. रा. येळवे वाडा, मंगळवार पेठ ता. कराड, ह. मु. पडेगाव), विवेश माधवराव देशमुख (४५, रा. प्रवीणनगर, बळसोड, ता. जि. हिंगोली), मुस्तकिन मुस्ताक शेख (४२, रा.शकरपुर, पूर्व दिल्ली), अजीज याकुब कासकर (५६ रा. दापोली जि.रत्नागिरी, ह.मु. पडेगाव) या चौघांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे व जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, सहा. फौजदार दिनेश बन, पोहेकॉ. विनोद नितनवरे, जालींदर रंधे, बाळासाहेब आंधळे, पोकॉ. विशाल पाटील, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील, हनुमान ठोके, राजाभाऊ कोल्हे , चांदे आदींनी केली.