इटकळ – तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव शिवारात बोअर ची मोटार काढत असताना विद्युत तारेस स्पर्श झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू.ही घटना शनिवार दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान केशेगाव शिवारात घडली.
अधिक माहिती अशी की, मौजे केशेगाव येथील शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतातील बोअर मधील मोटार कप्पीच्या सहाय्याने काम सुरू होते त्यावेळी कप्पीचा स्पर्श महावितरण च्या जिवंत विद्युत तारेस झाला आणि यावेळी काम करणारे काशिम कोंडीबा फुलारी वय ५४ वर्ष, रतन काशिम फुलारी १६ वर्ष, रामलिंग नागनाथ साखरे वय ३१ वर्ष व नागनाथ काशिनाथ साखरे वय ५५ वर्ष सर्व राहणार केशेगाव ता.तुळजापुर यांचा तीव्र विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
मृतामधील रतन फुलारी हा इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असून वेळ प्रसंगी वडिल कासीम फुलारी यांना मदत करीत होता पण विद्युत तारे च्या धक्क्याने या पिता पुत्राचा मृत्यू झाल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतामधील काशिम व रतन हे पिता पुत्र असून नागनाथ व रामलिंग हे ही पितापुत्र विजेच्या या तीव्र धक्क्याने चौघांचा ही जागीच मृत्यू झाला असल्याने केशेगाव व परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी गाव परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली अधिक तपास नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत इटकळ औट पोस्टचे पोलीस करीत आहेत.

























