कुर्डुवाडी – मशीन मध्ये अडकलेले एटीएम कार्ड काढून देतो तसेच पैसे काढून देतो म्हणून शिक्षकासह आणखी एका जणाची फसवणूक करुन अज्ञाताने दोघांची मिळून एकूण ५९ हजारांची फसवणूक केल्याची घटना दि. १७ आक्टोबर रोजी ते २५ आक्टोबर दरम्यान कुर्डुवाडी येथे घडली. याबाबत भैरु जनार्दन फरड रा.पडसाळी ता.माढा यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी हे दिवाळी खरेदीकरीता पैसे काढण्यासाठी दि.१७ आक्टोबर रोजी दु.१२.३५ वा.सुमारास ते दि. २५ आक्टोबर दु.४.०९ वा.सुमारास कुर्डुवाडी बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एटीएम मध्ये पैसे काढण्याकरिता गेले होते.त्यावेळी लगेच एक अनोळखी इसम देखील तिथे आला. त्यावेळी फिर्यादी चे एटीएम कार्ड मशीन मध्ये अडकले असता त्याने मी काढून देतो असे सांगून त्याने ते एटीएम कार्ड काढले पण हातचलाखीने ते एटीएम बदलून फिर्यादीला दुसरेच एटीएम कार्ड दिले.
फिर्यादीने न पाहाताच ते एटीएम कार्ड खिशात टाकले.त्यानंतर फिर्यादी हे कृषीदुकानात साहित्य खरेदीकरीता गेले असता तिथे त्यांना १२.३५ च्या दरम्याने बँकेला लिंक असलेल्या मोबाइलवर चारवेळा १० हजार रुपये व दोनवेळा ५ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला.त्यावेळी त्यांनी खिशातील एटीएमकार्ड पाहिले असता सदर एटीएम कार्ड हे दुसरेच शंकर बबन पवार यांच्या नावाचे दिसले.त्यानंतर फिर्यादीने त्यांचे खाते असलेल्या बँक आॅफ इंडिया लऊळ शाखेत जाऊन ते एटीएमकार्ड बंद केले.
तसेच फिर्यादीच्या ओळखीचे बंडू दत्तात्रय जाधव रा.उजनी ता.माढा यांचे देखील त्याच एटीएम मध्ये त्याच दिवशी एका अनोळखी इसमाने तुम्हाला पैसे काढून देतो म्हणून एटीएम कार्ड घेतले होते.पण पैसे निघाले नाहीत. मात्र कार्ड बदलून जयश्री आर रुपनवर यांचे नावाचे दुसरेच कार्ड दिले. थोड्याच वेळाने दु.१२.४० वा सुमारास जाधव यांच्या मोबाइलवर ३ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर दि.२५ आक्टोबर रोजी ६ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला.
अज्ञात इसमाने एटीएम पीन ची माहिती घेऊन वरील दोघांचे एटीएमकार्ड हातचलाखीने बदलून दोघांचे मिळून सुमारे ५९ हजार परस्पर काढून फसवणूक केल्याबद्दल दि.३० रोजी अज्ञात इसमावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

























