किनवट – नगरपरिषद कार्यक्षेत्रात मोकाट फिरणाऱ्या अश्ववर्गीय प्राणी (गाढव व खेचर) यांमुळे होणाऱ्या संभाव्य वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक गुरुवारी (दि. २९ जानेवारी २०२६) दुपारी ३.३० वाजता नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात पार पडली.
बैठकीस नगरपरिषद मुख्याधिकारी मुगाजी काकडे, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक झाडे, कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव तसेच किनवट शहरातील अश्ववर्गीय प्राण्यांचे पशुपालक उपस्थित होते.
मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या वाहतूक अपघातांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरपरिषदेकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पशुपालकांना त्यांच्या जनावरांना रस्त्यावर मोकाट फिरू न देता कामानंतर निश्चित ठिकाणी बांधून ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच जनावरे ज्या ठिकाणी बांधून ठेवली जातील, त्या ठिकाणाची माहिती प्रशासनास देणे बंधनकारक राहील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
यापुढे रस्त्यावर कोणतेही मोकाट गाढव किंवा खेचर आढळून आल्यास महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत अधिनियम १९६५ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला. संबंधित पशुपालकांना आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
बैठकीदरम्यान पशुपालकांनी मांडलेल्या सूचनांची प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली. ही बैठक शांततेत व यशस्वीरीत्या पार पडली असून, किनवट शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पशुपालक व नगरपरिषद प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


















