बार्शी – बार्शी शहरातील मातृभूमी प्रतिष्ठानने आपल्या समाजसेवेच्या उपक्रमात आणखी एका नवीन उपक्रमाची भर घातली आहे. गरजवंत लोकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत डोळ्यांचे ऑपरेशन हा उपक्रम त्यांनी सुरु केला असून या उपक्रमाची माहिती मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे व अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. अभिजित आडसूळ, डॉ. मोहसीन पटेल, प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. किरण गाढवे, शहाजी फुरडे पाटील आदी उपस्थित होते.
मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘भगवंत नेत्रालय’ या नावाने सुसज्ज इमारत उभी करण्यात आली असून, या इमारतीत अत्याधुनिक पद्धतीने डोळे तपासणी व ऑपरेशन केले जाणार आहेत. या ठिकाणी नेत्ररोग तज्ञ म्हणून डॉ. अभिजित अडसूळ व डॉ. मोहसीन पटेल हे काम पाहणार आहेत. ही जागा नेत्रालयला संतोषकाका ठोंबरे यांनी विनामोबदला दिली आहे. तसेच नेत्रालयाला लागणारी यंत्रसामुग्री ही नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर व्यक्तींनी दिली आहे.
मातृभूमी प्रतिष्ठानकडून भविष्यात बार्शी तालुक्यातील व शहरातील प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या शनिवारी सुरडी येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांच्या डोळ्यांच्या समस्या व त्यावरील उपचारासाठी जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने मोफत गरजूंना जेवणाचे डबे पोहच केले जातात. बाहेर गावाहून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही मदत केली जाते. तसेच आधुनिक क्रीडांगणाचेही काम प्रतिष्ठानच्यावतीने चालू आहे.
























