अकलूज – यापूर्वी खासदार नव उद्योजक कार्यक्रम पार पडला त्याला मिळालेला प्रतिसाद आणी यश पाहता पुन्हा एकदा हा कार्यक्रम करायचा ठरवलं आहे. या कार्यक्रमात दरवर्षी, सर्वांना संधी देण्याचा, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या वतीने प्रयत्न असणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी शिवराई वाडा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना शितलदेवी म्हणाल्या, मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही 15 ते 18 डिसेंबरला गांधी नगर येथे जो उद्योजक मेळावा आहे यामध्ये सगळ्यांना संधी असणार आहे आणि याकरता आपण परत एकदा इच्छुकांची परीक्षा घेत आहे. त्याच्यातून लोक निवडले जातील, त्यांना आपण दौऱ्याला पाठवणार आहे. मागच्या वर्षी 100 लोकांचा दौरा होता. त्यामधील नवीन व्यवसाय 21 लोकांनी सुरू केले आहेत. त्यामध्ये तालुका निहाय व्यवसाय पाहिले तर माळशिरस तालुका 13 लोकांनी, माढा तालुक्याचे 4, पंढरपूर 7, करमाळा 5, फलटण, 2, माण 1, सांगोला 3 असे एकूण 34 व्यवसाय सुरू झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
पुढे मोहिते पाटील म्हणाल्या, एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये 1 हजार 125 लोक सहभागी झाले होते. परत स्किल डेव्हलपमेंटचा वर्कशॉप या माध्यमातून ठेवले होते. यामध्ये 282 लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, बचत गटांनी सामील व्हावे, कारण बचत गटांचे प्रॉडक्ट चांगले असतात असे म्हणून, हा दौरा संपूर्णपणे मोफत असणार असल्याचेही शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या.




















