टेंभुर्णी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत “सशक्त महिला – सशक्त परिवार” या घोषवाक्याला अनुसरून टेंभुर्णी ग्रामपंचायत यांच्या वतीने “ॲनिमिया मुक्त टेंभुर्णी” या अभियानाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अण्णाभाऊ साठे सभागृह, ग्राम सचिवालय, टेंभुर्णी येथे पार पडले. या शिबिरामध्ये मुली व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण जाणून घेण्यासाठी व ॲनिमिया प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपर सत्रही घेण्यात आले.
महिलांचे आरोग्य म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवून आत्मनिर्भर व आरोग्यदायी समाज घडविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
अशा प्रकारचे उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत सातत्याने राबविल्याने महिलांमध्ये आरोग्यसाक्षरता वाढेल आणि “सशक्त महिलेकडून सशक्त समाज” या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल.
कार्यक्रमाचे आयोजन टेंभुर्णीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ सुरजाताई बोबडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले. शिबिरामधील आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सायली माळी तसेच डॉ.काझी, डॉ. हिलाले , आशा वर्कर व इतर सर्व आरोग्य केंद्रातील स्टाफ उपस्थित होता.
या उपक्रमामुळे टेंभुर्णी ग्रामपंचायतने आरोग्यवर्धनाच्या दिशेने एक प्रेरणादायी आणि अनुकरणीय पाऊल टाकले आहे.


















