मुंबई :भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत “वाचनालय” उभारून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, “विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘मोफत खुले वाचनालय’ उभारण्यात येणार आहे.”
या वाचनालयांमध्ये वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व.पु. काळे, विश्वास पाटील अशा नामवंत साहित्यिकांच्या कृती उपलब्ध असतील. तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ ठेवण्यात येणार आहेत.
“हा ‘वाचन कट्टा’ मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरवेल,” असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
चौकट:
“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरी निमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही ‘अनमोल भेट’ देत आहोत. वाचन संस्कृती आणि मराठी साहित्याचा प्रचार हा आमचा लोकाभिमुख उपक्रम आहे.”
— प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री