देगलूर – तालुक्यातील मोजे सुंडगी बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (इयत्ता पहिली ते पाचवी) स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून मोडकळीच्या अवस्थेत असून सध्या पूर्णतः बंद आहे. त्यामुळे शाळेतील महिला शिक्षिका, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छतागृहाची स्वतंत्र इमारत असूनही दुरुस्तीअभावी ती वापरात नसल्याने विशेषतः विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर व शालेय वातावरणावर होत असल्याचे चित्र आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सौ. सत्यभामा भीमराव दिपके (रा. मोजे सुंडगी बु.) यांनी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांना लेखी निवेदन सादर करून स्वच्छतागृह दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मंजूर करून सदर स्वच्छतागृह तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व शिक्षण लक्षात घेता या विषयावर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे.


















