धाराशिव – जिल्ह्यातील आठ नगर परिषदेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर आदिवासी पारधी समाजातील रणरागिणींना जनतेने कौल देवून भरघोस मतांनी विजयी केले आहे. समाजातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणारे आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे हे या निवडणुकीत गेमचेंजर ठरले आहेत. या यशाबद्दल नूतन नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, वंदना बापू पवार, शालाबाई शिवा पवार, सुरेखा दत्ता काळे यांचा सुनील काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ.वंदना बापू पवार यांनी मोठे मताधिक्य घेवून दणदणीत विजय मिळविला आहे. भूम नगर परिषदेत सुरेखा दत्ता काळे, कळंब नगर परिषदेत शालाबाई शिवा पवार यांनीही घवघवीत यश मिळवत नगरसेविका झाल्या आहेत. त्याचबरोबर धाराशिव नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे आणि प्रभागातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी जीवाचे रान केले होते. त्यामुळे आदिवासी पारधी समाज भारतीय जनता पार्टीसोबत असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेविकांचा आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून पेढे भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी भूम, कळंब, धाराशिव येथील बांधवांनी सुनील काळे यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक बापू पवार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























