सोलापूर – सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात महाराजांचा १४८ वा प्रकट दिन सोहळा भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसर भक्तीमय झालेला दिसून आला आहे. यावेळी आकर्षक आणि सुवासिक फुलांनी मंदिर परिसर सजावट केल्याने चैतन्याचे आणि प्रसन्नतेचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, प्रकट दिनानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण, पालखी प्रदक्षिणा, स्वरसंध्या तसेच भजन-कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत असून महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. प्रकट दिनाच्या दिवशी पहाटे तीन वाजता मंगलवाद्यांच्या गजरात कार्यक्रमांना सुरुवात झाली. यानंतर भूपाळी, काकड आरती, अभिषेक व गुलाल कार्यक्रम भक्तिभावात पार पडला.
सकाळच्या आरतीनंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर मंदिरात धार्मिक विधी सुरू असून वातावरण भक्तिरसाने ओथंबले आहे. सायंकाळी ५.३० वाजता श्री गजानन महाराजांची भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. फुलांनी सजवलेली पालखी, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा सहभाग यामुळे प्रदक्षिणेला विशेष शोभा येणार आहे. या पालखी प्रदक्षिणेसाठी परिसरात विशेष तयारी करण्यात आली आहे.
धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत मंदिर समितीच्या वतीने सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक तरुणांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून हा उपक्रम भाविकांकडून कौतुकास पात्र ठरत आहे.
या सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. सर्व भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कान्नूरकर यांनी सांगितले. शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी स्वयंसेवक व समिती सदस्य परिश्रम घेतले. श्री गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकट दिनानिमित्त सोरेगावमध्ये साजरा होणारा हा सोहळा भक्ती, सेवा आणि सामाजिक जाणीवेचे सुंदर दर्शन घडवत असून भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.
























