बार्शी – सौंदरे या ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर चमकदार झळाळी घेत महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश गोटे यांना “राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट शिक्षक” आणि “राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट प्राचार्य” हे दोन मानाचे किताब मिळाल्याने सौंदरे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. नवी मुंबईतील भावे नाट्यगृहात इंडियन टॅलेंट ऑलंपियाडतर्फे आयोजित भव्य समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. ७४ देशांमध्ये ऑलिंपियाड स्पर्धा घेणाऱ्या या संघटनेतर्फे मिळालेला राष्ट्रीय गौरव महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रा. गोटे यांनी एमसीएम, एमसीपी, डी.ई.कॉम, एमबीए अशी बहुविध पदवी प्राप्त केली असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी त्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. गतवर्षी संगणक विज्ञान ऑलिंपियाडमध्ये शाळेने २ आंतरराष्ट्रीय क्रमांक व ९ सुवर्णपदके मिळवत भरीव कामगिरी केली होती.
समारंभाला देशाची पहिली महिला आयपीएस व माजी राज्यपाल डॉ. किरण बेदी, तसेच पद्मभूषण, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती सायना नेहवाल उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. गोटे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य गोटे म्हणाले, “शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते नसते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीचा आणि समाजाभिमुख शिक्षणाचा मार्ग म्हणजे खरे शिक्षण. विद्यार्थ्यांची प्रगती हाच शिक्षकाच्या कार्याचा खरा गौरव.
या दुहेरी राष्ट्रीय सन्मानामुळे महात्मा फुले विद्यालयात आणि सौंदरे परिसरात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील शिक्षकांनी केलेल्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याने सर्वत्र प्रा. गोटे यांचे कौतुक होत आहे.


















