मोडनिंब – येथे गणेश जयंती सोहळा धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडला. बाप्पाच्या मूर्ती समोर छोट्या पाळण्यामध्ये श्रीफळ रूपी बाप्पाला बसवून पारंपरिक पाळणा म्हणत बाप्पाचा जन्मोसत्व साजरा करण्यात आला.दुपारी बारा वाजता पुष्प वृष्टी करण्यात आली.फटाक्यांची आतषबाजी झाली नंतर महाआरती झाली.
दिवसभर भजनकीर्तन व गणपती भक्तिगीतांचे कार्यक्रम सुरू होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई, रांगोळी करण्यात आली होती.सहस्त्रावर्तन, अभिषेक, महापूजा, कीर्तन, प्रवचन, अथर्वशीर्ष पठण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. भक्त मंडळांच्या वतीने आरतीसह महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
गणेश जयंतीनिमित्त मंदिरामध्ये फुलांची आरास करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांनी केलेली ही आरास भाविकांचे लक्ष अधिकच वेधून घेत होती.जन्मोत्सव सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दत्ता सुर्वे, नितीन सुर्वे, सोमनाथ माळी, मोहन शेळके, दत्तनगर गणेश मंडळ, आदर्शनगर गणेश मंडळ यांनी परिश्रम घेतले.
























