राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने पाऊणे दोन वर्षात ४५ हजार कोटींचा निधी दिला आहे. राज्यात विकासाची गंगा वाहत असून हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांचे आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. सासवड येथील महायुतीच्या शेतकरी जनसंवाद मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते विजय शिवतारे उपस्थित होते.
लोकसभेची यंदाची निवडणूक वैयक्तिक लढाई नाही तर विचारांची आणि विकासाची लढाई आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची ही निवडणूक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विजय बापू एक शिस्तीचा शिवसैनिक आहे. पुरंदर आणि हवेली तालुक्यातील रेंगाळलेली कामे आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की पुरंदरचा पुढचे किल्लेदार विजय शिवतारे असतील.
सरकारकडून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात असे सांगतानाच मंत्रिमंडळ बैठकीत येणाऱ्या प्रस्तावांवर विलंब न लावता निर्णय घेतला जातो. हे प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे सरकार असून एसी केबिनमध्ये बसून आदेश देणारे सरकार नाही, असा टोला त्यांनी उबाठा गटाला लगावला. लोकहिताच्या फाईल्सवर सही करण्यासाठी अगोदच्या मुख्यमंत्र्यांच्या खिशाला पेनसुद्धा नव्हता, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
कोरोना काळात हिंदु सणांवर बंदी होती. अमेरिका, चीनमध्ये रुग्ण वाढले की त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात व्हायचा. आपले सरकार सत्तेत आले तेव्हा सरकारने सणांवरील बंदी उठवली. अर्थव्यवस्थेला चालना दिली. सरकारच्या कामाच्या झपाट्याने कोविड पळून गेला, असे त्यांनी सांगितले.
विजय शिवतारे यांच्या नाराजीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो. मात्र गमवायला काही मिनिटे लागतात. त्यामुळे कार्यकर्ता टिकवण्यासाठी आम्ही बंड केले होते.
केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी १२ हजार रुपये दिले जातात. पिकविमा एक रुपयात दिला जातो. मागील दीड पाऊणे दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी रुपये दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सोडणार नाही. शेतकऱ्यांना ज्या ज्या सुविधा हव्यात ती सर्व कामे नियमित सुरु ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बारामती मतदारसंघाचा मागील १५ वर्षात खेळ खंडोबा झाला. नुसती भाषणे देऊन कामे होत नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. मात्र या निवडणुकीत खंडोबाचा आशिर्वाद सुनेत्रा ताईंच्या पाठीशी आहे. त्यांना दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळायला हवे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.