दक्षिण सोलापूर – निंबर्गी येथील प्रगतशील शेतकरी व निंबर्गी अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.चे अध्यक्ष गंगाधर प्रफुल्लचंद्र बिराजदार यांची महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित इस्राईल आंतरराष्ट्रीय शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत १० दिवसाचा हा दौरा असणार आहे.महाराष्ट्रातून १७ शेतकरी व ३ कृषी अधिकारी असे २० जणांचा या दौऱ्यात समावेश आहे .
इस्त्राईल हा देश कमी पाणी, प्रतिकूल हवामान व मर्यादित नैसर्गिक संसाधने असूनही उच्च उत्पादन देणाऱ्या आधुनिक शेती पद्धतींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ठिबक सिंचन, पाणी व्यवस्थापन, ग्रीनहाऊस शेती, संशोधनाधारित उत्पादन पद्धती, निर्यातक्षम शेती आणि शेतकरी–संशोधन संस्थांमधील समन्वय यामुळे इस्त्राईल शेतीचा जगात आदर्श देश म्हणून उल्लेख केला जातो. इस्त्राईल मध्ये प्रामुख्याने तेल अविव, होल्कॅनिक सेंटर ,रिशोन लेझीऑन,माशाव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र,डेड सी,GINO गॅलोली येथे रोबोटीक शेती,रमत निगेव येथे अत्याधुनिक ड्रीपसिंचन प्रणाली या अभ्यास दौऱ्यात या सर्व तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात येणार आहे. बिराजदार यांनी द्राक्ष व तुर शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, यांत्रिकीकरण, कमी खर्चात उत्पादन वाढ, आधुनिक यंत्रांची निर्मिती व वापर, तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक कार्य करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजपर्यंत त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरावर अनेक कृषि पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. गोदावरी तुरीच्या उच्चांकी उत्पादनाची दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने त्यांची या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
या दौऱ्यादरम्यान मिळणारे अनुभव व ज्ञान राज्यातील शेती विकासासाठी, विशेषतः द्राक्ष शेती, पाणी बचत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब व निर्यातक्षम शेतीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दौऱ्यानंतर बिराजदार हे मिळालेल्या ज्ञानाचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले .
या निवडीबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी आमदार दिलीप माने, जिल्हाकृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख लालासाहेब तांबडे , यांच्यासह कृषी अधिकारी, सहकारी संस्था, FPC सदस्य, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून बिराजदार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.























