फूलवळ / नांदेड – शहरातील सिद्धार्थ नगर रोडवरील स्मशानभूमीजवळ असलेल्या गंगाई कृषी सेवा केंद्र या दुकानाला शुक्रवारी पहाटे अचानक भीषण आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दुकान मालक सुभाष शंकरराव मठपती यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दररोजप्रमाणे 4 तारखेला रात्री अंदाजे 8 वाजता दुकान बंद करून घरी गेले. मात्र 5 तारखेला पहाटे सुमारे 4 वाजता प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दुकान जोरदार पेटलेले दिसले. दरम्यान, कंधार नगरपरिषद अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने मदत करून आग विझविण्यात हातभार लावला.
या घटनेत दुकानातील खत, बियाणे, कृषी औषधे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साधने अशी मोठ्या प्रमाणावर सामग्री जळून खाक झाली असून अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले. आगीत नेमके किती नुकसान झाले याचे पंचनामे सुरू असून पुढील तपास सुरू आहे.























