मागील वर्षी आशियातील सर्वात श्रीमंत असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना यावर्षीच्या सुरुवातीला आलेल्या शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचा मोठा फटका बसला आणि त्यांची संपत्ती अर्ध्याहुन जास्त कमी झाली. अशा प्रकारे गौतम अदानी यांनी एका वर्षात सर्वाधिक तोटा सहन करण्याचा रेकॉर्ड नोंदवला, परंतु अलीकडेच परिस्थितीने नवीन वळण घेतले आणि अदानी समूहाचे शेअर्स पुनः सुसाट धावू लागले.
मागील काही दिवस भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी चांगले ठरले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर अदानी समूहाच्या शेअर्सनी उंच भरारी घेतली परिणामी त्यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर गेल्या २४ तासांत गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती ठरले आहेत. अदानी समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत एकाच दिवसात १२.३ अब्ज डॉलर किंवा सुमारे १०,२५,४०,१८,००,००० रुपयांची वाढ झाली. यासह अदानी एका दिवसात सर्वाधिक कमाईच्या बाबतीत नंबर एक अब्जाधीश बनले आहे. गौतम अदानी यांच्यासाठी मंगळवार आनंदाचा दिवस राहिला. अदानी समूहाचे बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स २०% पर्यंत उडी घेतली ज्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ८२.५ अब्ज डॉलर्सवर झाली आणि ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १५ व्या स्थानावर पोहोचली.
गौतम अदानी सुसाट
मंगळवारी अदानींनी कमाईच्या बाबतीत इतर सर्व श्रीमंतांना मागे टाकले आणि आता मुकेश अंबानींपेक्षा फक्त दोन स्थानांनी मागे आहेत. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत सध्या १३ व्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती ९१.४ अब्ज डॉलर आहे. तर आशियामध्ये अंबानी पहिल्या तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर असताना आता दोघांच्या संपत्तीत केवळ ८.९ अब्ज डॉलर्सचा फरक आहे. उल्लेखनीय आहे की यावर्षी अदानींच्या एकूण संपत्तीत ३८ अब्ज डाॅलरची घट झाली, तर अंबानींची एकूण संपत्ती ४.३३ अब्ज डाॅलरने वाढली.
अदानी शेअर्सची जोरदार उसळी
मंगळवारी अदानी समूहाच्या सर्व दहा सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी २० टक्क्यांपर्यंत वाढले. यासह, समूहाचे मार्केट कॅप १,९२,६४६ कोटी रुपयांनी वाढून १३,८८,१८७ कोटी रुपये झाले मात्र, जानेवारीच्या तुलनेत ते अजूनही ५,३३,५१६ कोटी रुपये कमी आहे. गेल्या वर्षी या यादीत गौतम अदानींनी श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मजल मारली होती, परंतु यावर्षी २४ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या अहवालात समूहावर अनेक आरोप करण्यात आले जे अदानी समूहाकडून फेटाळण्यात आले.
श्रीमंतांच्या यादीत कोण कितव्या स्थानी?
जगातील श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क २२२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर असून मंगळवारी त्यांची एकूण संपत्ती २.२५ अब्ज डॉलरने वाढली. तर ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझोस या यादीत १७१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या, फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट (१६९ अब्ज डाॅलर) तिसरे, बिल गेट्स (१३४ अब्ज डाॅलर) चौथ्या, लॅरी एलिसन (१२९ अब्ज डाॅलर) पाचव्या, स्टीव्ह बाल्मर (१२९ अब्ज डाॅलर) सहाव्या, वॉरेन बफे (११९ अब्ज डाॅलर) सातव्या, लॅरी पेज (११९ अब्ज डॉलर) आठव्या स्थानावर आहेत. तसेच फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (११५ अब्ज डाॅलर) नवव्या स्थानावर आणि सर्गे ब्रिन (११३ अब्ज डाॅलर) दहाव्या स्थानावर आहेत.