सांगोला – नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी मतदारांना दिलेल्या शब्द पूर्ण करण्यासाठी सांगोला नगरपालिकेच्या सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात माजी आ.स्व.गणपतरावजी देशमुख यांचे स्मारक उभारणे कामास मंजुरी घेण्यात आल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील यांनी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, नगरसेवक काशिलिंग गावडे, माऊली तेली उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून वासुद रोड येथे नमो उद्यान व पाण्याच्या टाकी समोर योगा केंद्र उभारण्यास मंजुरी, थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यासाठी मंजुरी, वंदे मातरम चौकातील उद्यानाला व नवीन होत असलेल्या भाजी मंडईला उमाजीराजे नाईक यांचे नाव देण्यास मंजुरी, दि.८ मार्च रोजी असलेल्या महिला दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना मंजुरी तसेच शहरातील मोकाट जनावरे यांना गोशाळेत सोडण्यासाठी होणाऱ्या खर्चाला या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आल्याची माहिती अरुण पाटील यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसृष्टी उभा करण्यासाठी २ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर असून सर्व शिवप्रेमींचे मत विचारात घेऊन पुढील काम करण्यात येईल. तसेच विविध समाजांचे सभागृह बांधण्यासाठी २० कोटी रुपये निधी मंजूर असून जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणे ते काम पूर्ण केले जाईल. आयोध्या नगरी येथे बांधण्यात आलेल्या सभागृहास माजी आ.शहाजीबापू पाटील यांचे नाव देण्यास मंजुरी घेण्यात आली आहे.
– आनंदा माने, नगराध्यक्ष


























