आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. गाणी, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना आहे. चिठ्ठी आयी है.. ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही.
पंकज उधास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकजींनी आपल्या गायकीनं वेगळी ओळख तयार केली होती. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ते गेली अनेक दिवस आजारी होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारपणामुळे त्यांचा निधन झालं आहे. आज, सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. यात त्यांनी लिहिलंय, ‘अत्यंत जड अंतःकरणाने, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले. उधास परिवार.’ यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची सिनेसृष्टीतील आणि संगीतातील कारकीर्द ही अतिशय मोठी होती. त्यांच्या गझल, त्यांची अनेक गाणी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. त्यांचं ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याने तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आज स्वरसम्राट हरपला अशी भावना प्रेक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे. त्यांची ‘चांदी जैसा रंग’, ‘एक तराफा उसका घर’, ‘मैं नशे मे हू’, ‘मैं पिता नही हू’ यांसारखी अनेक गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती.
उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी जेतपूर (गुजरात) येथे झाला होता. १९८० मध्ये ‘आहत’ नावाच्या गझल अल्बमच्या रिलीजने त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल येथे पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील “चिठ्ठी आयी है” गाण्याने उधास यांना आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंकज उधास यांचं जाणं फारच वाईट – सुरेश वाडकर
पंकज उधास यांनी आपल्या गझलने समस्त दुनियेला आनंद दिला. ते आपल्यातून गेले, ही धक्कादायक बातमी आहे. पंकज उधास यांचं जाणं फारच वाईट झालं, त्यांच्या कुटुंबाबाबत विचार करुन माझ्या अंगावर काटा येतोय. त्यांची पत्नी, कन्या खूपच प्रेमळ मुलगी, अशा भावना गायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केल्या. पंकज उधास उच्चशिक्षित होते, इतका मोठा गाणारा माणूस, चांगला मित्र आज आम्ही गमावला. त्यांच्या कुटुंबीयांना इतका मोठा धक्का पचवण्याची शक्ती ईश्वर देवो, ही प्रार्थना.