मोडनिंब – मोडनिंब (ता. माढा) येथील बसस्थानकातील सततच्या गैरसोयी, रात्रीच्या वेळेस एस.टी. व शिवाई बसेस न थांबणे, बस कंट्रोलचा अभाव, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव या गंभीर प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी मोडनिंब येथील प्रदीप गिड्डे उपोषणास बसले होते.परिवहन विभागाच्या प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आज त्यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.उपोषणाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभागीय वाहक निरीक्षक प.रा. नकाते आणि कुर्डूवाडी आगार प्रमुख रत्नाकर लाड यांनी आंदोलनस्थळी भेट देत गिड्डे यांच्याशी चर्चा केली. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व मागण्या मान्य असल्याचे नमूद करत त्यांनी याबाबतचे लेखी पत्र गिड्डे यांना दिले.मोडनिंब बसस्थानकात सर्व प्रवासी चढ–उतार अनिवार्यपणे बसस्थानकातूनच करावेत, यासाठी सर्व आगारांना तात्काळ सूचना काढण्यात येणार आहेत. मोडनिंब स्थानकात न येता महामार्गावरूनच पुढे जाणाऱ्या बसेसच्या चालक–वाहकांवर थेट कारवाई करण्यात येईल, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले.बसस्थानकावरील स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, इमारत दुरुस्ती अशा मूलभूत सेवांसाठीचा प्रस्ताव ९० दिवसांत कार्यवाही करून पूर्ण करण्यात येईल. तसेच अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही पाठवून कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.आंदोलनाला भाजपा मोडनिंब शहर, भगवा वादळ, शिवसेना तसेच धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संस्थेने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी कैलास तोडकरी,प्रदीप गिड्डे, संतोष लोकरे, दिपक सुर्वे,बाळासाहेब वागज, अजय चोपडे,प्रथमेश शिंदे,अजित चोपडे, बालाजी माळी, अजय खडके, वाहतूक नियंत्रक बोरकर आदि उपस्थित होते.
सर्व बसेस मोडनिंब स्थानकात येणार; निलंबनाचीही कार्यवाही – विभाग नियंत्रक
मोडनिंब बसस्थानकात येण्यास टाळाटाळ करणाऱ्या चालक–वाहकांवर कडक कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास निलंबनाची कारवाईही केली जाईल. मोडनिंब बसस्थानकात सर्व बसेस नियमितपणे थांबतील, याची खबरदारी घेऊ.
अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक,
राज्य परिवहन सोलापूर विभाग


























