पंढरपूर – गेली अनेक वर्ष विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेणारे डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर आणि द ह कवठेकर या दोन्ही प्रशालांसाठी सॅनेटरी पॅड व डिस्पोजल मशीन नुकतेच भेट देण्यात आले. यामुळे मुलींना शिक्षण घेणे अधिक सोयीस्कर होणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव सू.र.पटवर्धन यांनी व्यक्त केले.
आजपर्यंत अनेक विद्यालयांमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये कार्य चालू आहे यामध्ये डिस्पोजल मशीन बसविणे अंध अपंगांसाठी बॅटरी ऑपरेटेड सायकल उपलब्ध करून देणे वृद्धांसाठी काठी उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पंढरपूर तालुक्यातील इतरही काही शाळांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव फकीर आतार यांनी केले. यापुढील काळात देखील संस्था विद्यालयांसाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याचे मत डिसेंट फौंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी रोटरी झोन टू पुणे चे असिस्टंट गव्हर्नर धनंजय राजूरकर तसेच रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे सागर ताजने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षक मुख्याध्यापक पालक आणि विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले आहे.


























