सोलापूर – कर्तुत्व हे केवळ स्वीकारातून नव्हे तर त्यागाने सिद्ध होते. कर्तुत्वाशिवाय मनुष्यावर भगवंताची कृपा होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. विकास सहकारी बँकेतर्फे हेरिटेज लॉन्स येथे आयोजित तीन दिवसीय ‘वाग्यज्ञ’ च्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी शुक्रवारी ह.भ.प. देगलूरकर महाराजांनी मार्गदर्शन केले.
ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर ‘म्हणोनि जेथ श्री श्रीमंतु (कर्तुत्व आणि कृपा) या श्री ज्ञानेश्वरीतील १८ व्या अध्यायातील ओवीवर प्रवचन केले. यावेळी त्यांनी मानवी जीवनातील कर्तुत्व आणि त्यावर असलेल्या भगवंताच्या कृपेचे अवलंबित्व यावर विवरण केले.
ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, विचारांनी परिपक्व असणारा व्यक्ती भगवंताला अपेक्षित असतो. अंतःकरणाची अस्थिरता हे जीवदशेचे लक्षण आहे. तर वृत्तीची स्थिरता ही जीवनाला ज्ञानाचे अधिष्ठान असल्याचे लक्षण आहे. मनुष्याला कर्माचा त्याग करता येत नाही. मनुष्याचे कर्तुत्व आहे पण त्याच्यावर भगवंताची कृपा झाली नाही असे मनुष्याला अनेकदा वाटते. परंतु भगवंताने सुनियोजित केलेल्यावेळी त्या मनुष्यावर परमात्म्याची कृपा होतेच. मात्र ज्या व्यक्तीवर भगवंताची कृपा झाली आहे, त्याचे कोणतेही कर्तुत्व नाही ही बाब अशक्य आहे, असेही ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे पाऊस नाही आला तर समुद्र आटत नाही आणि पाऊस जास्त पडला तरी समुद्राला पूर येत नाही. कारण तो व्यापक आहे. भगवंतदेखील याचप्रमाणे व्यापक आहे. परिश्रम शब्द हा कर्तृत्वाचा वाचक आहे. कोणत्याही क्षेत्रात नैपुण्यासाठी परिश्रम आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी मनुष्यावर नैतिक, धार्मिक आणि मनुष्यत्वाची बंधने असतात, असेही ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले.
विकास सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष जेष्ठ संचालक सी. ए. राजगोपाल मणियार यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष कमलकिशोर राठी, उपाध्यक्ष राजगोपाल चंडक, ज्येष्ठ संचालक राजगोपाल मिणियार, हरीनिवास जाजू, पांडुरंग मंत्री, मनीष बलदवा, ज्योती आसावा, प्रवीण बजाज, सुनील माहेश्वरी आदी उपस्थित होते. संजीव कुसुरकर यांनी सूत्रसंचालन केले. शेवटच्या दिवशी ही सोलापूरकरांनी ‘वाग्यज्ञा’ ला मोठी गर्दी केली होती.

















