सोलापूर – श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे सीताफळाची आवक वाढली आहे. बाजारात गोल्डन सीताफळ ४० ते ८० रुपये किलो आणि गावरान सीताफळ ८० ते १२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
विशेषतः सीताफळाचा मुख्य हंगाम सुरू झाल्यामुळे बाजारात सीताफळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सीताफळासोबतच पेरू आणि सफरचंदासारख्या इतर फळांचीही आवक वाढली असल्याचे फळांचे व्यापारी मतीन बागवान यांनी सांगितले. सोलापूरसह इतर जिल्ह्यातून सीताफळची आवक होत आहे. यासह बाजारात सीताफळची मागणी देखील वाढत आहे.
दरम्यान, थंडीचा मौसम लवकरच सुरू होणार असल्याने सिताफळ आणि पेरू या फळांना विशेष करून ग्राहक पसंती दर्शवतात. त्यामुळे फळांची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे बाजार समितीमध्ये दिसून येत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये गावरान आणि गोल्डन अशा दोन पद्धतीचे सीताफळ विक्रीसाठी येत आहेत. नव्या पद्धतीचे गोल्डन सिताफळ ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्यासह ड्रॅगन, पेरू, पपई, चिकू, सफरचंद यांची देखील मागणी आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक फळबागा नष्ट झाल्यामुळे फळांचे दर सध्या तेजीत आहेत.
सीताफळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक तत्त्वं आहेत. हे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, हाडे आणि दात मजबूत करते, त्वचेचे आरोग्य सुधारते आणि हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.


















