टेंभुर्णी – दिवाळीचा उत्साह आणि बाजारपेठेतील खरेदीची लगबग सुरू असतानाच टेंभुर्णी शहरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. कुर्डूवाडी रोडवरील सलगर चहा शेजारी असलेल्या मोरया जीन्स कापड दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८० ते ९० हजार रुपयांचा रेडिमेड कपड्यांचा माल लंपास केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी दुकाने नव्या मालाने भरून ठेवली होती. काल मध्यरात्री चोरट्यांनी पॉवर जॉक आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने शटर फोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील नवीन जीन्स, पँट, शर्ट (३४, ३६, ३८ साइज) यांसह विविध कपड्यांचा माल त्यांनी चोरून नेला.
या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांकडून पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी व सीसीटीव्ही तपास जलद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी दुकानाचे मालक सुरज डरंगे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस करीत आहेत
सणासुदीच्या काळात वाढते चोरीचे प्रकार
टेंभुर्णी परिसरात गेल्या काही दिवसांत छोटे-मोठे चोरीचे प्रकार वाढत असून, यामुळे व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने गस्त वाढवून चोरट्यांना पकडावे, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून होत आहे.



















