नांदेड – गाढव आणि खेचर या अतिकष्टाळू व दुर्लक्षित प्राण्यांच्या आरोग्यसेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. “धर्मा डॉंकी सेंच्युरी” या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने आता या प्राण्यांच्या नियमित लसीकरण, तपासणी आणि उपचाराबाबत तसेच या प्राण्याची खरेदी-विक्री अधिकृत करणेबाबतचा आदेश जारी केला आहे.
गत दीड वर्षांपासून सगरोळी (ता.बिलोली) येथील “धर्मा डॉंकी सँच्युअरी” ही संस्था फेडरेशन ऑफ इंडीयन अॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (FIAPO) आणि अॅनिमल इंडिया फाऊंडेशन (AIF) यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई भागातील वीटभट्ट्यांवर आणि सगरोळी परिसरात रेती व बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या जवळपास २००० गाढवांच्या कल्याणासाठी कार्य करीत आहे. या कार्यक्रमात गाढव पालकांमध्ये जनजागृती, पशुधन विकास अधिकारी, पशु सहाय्यक व पशु पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण, तसेच गाढवपालकांचा शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेशी नियमित संपर्क प्रस्थापित करण्यासाठी विविध उपक्रम व बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मा. आयुक्त, पशु संवर्धन विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील उपायुक्तांना गाढव आणि खेचर या प्राण्यांना दरवर्षी दोन वेळा टीटी लसीकरण, डीवर्मिंग आणि औषधोपचार अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे. तसेच या प्राण्यांची खरेदी-विक्री अधिकृत होण्यासाठी पावती व प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबतचे निर्देश संबधित यंत्रणेस देण्यात आले आहेत. ही उपलब्धी केवळ गाढव पालकांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्राणी कल्याण क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. यामुळे गाढवांना योग्य उपचार मिळून ते निरोगी व आनंदी राहतील असा विश्वास “धर्मा डॉंकी सेंच्युरी” संस्थेने व्यक्त केला आहे. संस्थेच्या या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था आणि शासन अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
गाढवांना शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेंचा लाभ मिळावा. योग्य उपचार मिळावेत, इतर प्राण्यांप्रमाणे शासकीय धोरणामध्ये गाढवांना देखील स्थान मिळावे यासाठी पशु संवर्धन विभागाच्या मंत्री पंकजाताई मुंडे, सचिव डॉ. रामास्वामी एन., आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन विनंती केली होती, त्यास यश मिळाले असून यापुढे या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होण्यासाठी संस्था यापुढे काम करेल. अभिजीत महाजन, विश्वस्त – “धर्मा डॉंकी सँच्युअरी” सगरोळी (जि.नांदेड)
फोटो ओळ: इतर प्राण्यांप्रमाणे शासकीय धोरणामध्ये गाढव प्राण्याचा देखील समावेश करावा यासाठी ‘धर्मा डॉंकी सेंचुअरी’चे विश्वस्त अभिजीत महाजन यांनी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रावीणकुमार देवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.



















